Friday 30 August 2013

शतजन्म शोधिताना.....

ठरवून मुलुख सारा,भिजवून परतलो मी
कळ आतल्या जीवाची,चेतवून परतलो मी | 
अतृप्त आर्त वारा,त्रासून प्राशिला मी 
मर्जी नसे मनाची,भिजवून चाललो मी ||

बेरंग या जगाला, रंगून टाकताना 
रुधीरार्त आर्त  माझे हलकेच सांडताना |
तुज रंग रंजीताचा,रक्तरंज हा दिसेना 
मनी माझिया सखी हे,काहूर हासवेना ||

न्हावून घे बरे  तू ,आसुसल्या सुखाने   
दुखवू कसा पुन्हा मी बोलू कुण्या मुखाने?
कोंडून दुःख सारे,विस्फोट आज व्हावे
हे देह संचिताचे,भेदून लखलखावे || 

येशील का जगी तू,बनुनी पुन्हा धरा ती
मी मूक (कि मुक्त )मेघ नभीचा,बरसेल बेहीसाबी |
सोसून वेड सारे,रुजूदे पुन्हा मलाही
समजू नकोस काटा,मी पुष्प ते गुलाबी ||

रुजुनि तुझ्या ऊराशी,इकवार जन्म घ्यावा
हर याक्ष-प्रश्निकाला,जगुनी जवाब द्यावा |
ते मूक प्रेम माझे,स्पर्शून सांगताना 
देईन साथ तुजला,शतजन्म शोधिताना.... || 

व्यथा कधी न कळली हि कथा असे कोणाची?
"नभ-आर्त धरित्रीची" वा "प्रेम-प्रेमिकांची"  |
मज पामरे बळेची इतुकेच फक्त झाले 
                              ते दिव्य प्रेम त्यांचे, मी शब्दबद्ध केले    ||                   -मुकुंद.

No comments:

Post a Comment