Thursday 5 September 2013

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा,
उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा |
गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती,
जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती ||

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

रेडिओवर लागलेला मल्हार, नि स्वयंपाकघरातील खमंग वास
ऊबदार शालीत लपेटलेला मी, पण आठवणींच्या हुद्क्यांनी विखुरलेला श्वास |
निरवलेले डोळे, अन् मनात पावसाच्या सरींचे मंथन
भिजण्याच्या भीतीने धावणारी पावले, अन् हळूच किणकिणणारी पैंजण||

त्या दिवशी सार आभाळ, एकाएकी फाटलं होत
वैरी आहे लेकाचा असं, पहिले-पहिले वाटलं होत |    
वाटलं.....,वाटलं वेळ टळून गेली आणि आज पहायचही राहून गेल
उलट वेड पाखरू आज माझ्यासवे आडोशाला आल ||

(तेंव्हा तो पाऊस मला खरच आवडला होता.....)

रागावल्याचा आव आणत, मी कोण आहे? म्हणून विचारलं
थरथरणाऱ्या ओठांमधून, नकळत नाव तरी कळाल |
खिडकीपाशी आवाज ऐकून, घराचा मालक आला धावत
मग 'म' 'भ' ने निरोप समारंभ, आमच्या इज्जतीची वाट लावत ||

आठवत तुला, त्यानंतर कित्येकदा, त्याच रस्त्यावर गाठून
मी जाहीर माफी मागितली होती, पुन्हा पुन्हा भेटून |
मैत्रिणी काढू लागल्या खोडी, माझ नाव घेऊन
गाल लाल होऊ लागले, मनातल्या मनात लाजून ||

मग हातात हात, गळ्यात गळे
डोळ्यात स्वप्न, स्वप्नात झुले |
आधी चोरून सिनेमा, मग हळूहळू प्रेमपत्र
आणाभाका घेत आयुष्याच्या, घालवलेली रात्र ||

कधी धाय मोकलून रडणार आभाळ, अन् असह्य होणारा दुरावा
अनन्य ओढीच्या, चिंब भेटींना, या पावसाचाच पुरावा |

(तेंव्हा हा पाऊस सुद्धा माझ्यासवे गहिवरला होता खरा.....)

मग ओसरलेला पाऊस, अन् मातीत साठलेला ओलावा
चिंब भिजलेल्या कड्यावर फुललेला, रानफुलांचा ताटवा |
तुझा फुलांसाठी लाडीव हट्ट आणि मी जवळून पाहिलेलं मरण
भासमात्र पाऊल म्हणत, दोन्हीपैकी एक याव फिरून ||

एक अशीच भिजरी सांज, अन् तो नानेघाटातील डोंगर
तारुण्याचा कैफ उतरवता झाला, स्वप्नांना लागलेला पोखर |
कातीव घाटातील एक अंधारी वळण,
अन् वास्तवाच्या तीव्र झोतावर मांडलेल, माझ्या प्रेमाच सरण ||

पावसाइतक नशीब खरच, मला मिळाल नाही 
कारण पावसाला आणि तुला कोणी विलग करू शकल नाही |
तुझ्या मनात पाऊस म्हणून पावसानंतर यायचीस तू 
आधी नाही कळल कि हे त्रेराशिकच लागलय चुकू.....||

(आता वीज चमकली कि, तो मला हसत असल्याच जाणवत राहत.....)

पाऊस कायमचा माझा झाला, तसं आमचं Agreement सुद्धा झाल 
नंतर कळल मोबदल्यात त्यान, तुलाच येथून हिरावून नेल |
Contract renewal ची अट आता, आयुष्यभर झेलावी लागतेय
अन् प्रत्येक वेळी पाऊस आला कि मला अपराध्यासारख वाटतंय ||

पश्चातापाचे अश्रू अन् उदवेगांचे आवंढे गिळतोय
चिता माझीही धगधगतेय,फक्त मी wheel-chair वर जळतोय |
घाबरू नको या मुर्दाड जिवाच, याहून वाईट होणार नाही 
आधीच तुला दिल असल्याने, ऊर भरूनही काळीज मात्र फुटणार नाही || 

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

तरीही मी आशा सोडलेली नाही, कि तू पुन्हा माझी होशील 
सखे पावसासह दामिनी होऊन, पुन्हा माझ्या घट्ट मिठीत येशील |
त्याच्यापासून तुला मी हिरावून घेईन, म्हणून तो नेहमीच घाबरतो 
माझ्या आवारात आला कि, आजकाल तो केवळ रिमझिम बरसतो ||
  
म्हणून, म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....           -मुकुंद.

No comments:

Post a Comment